EXCLUSIVE: मनोहर जोशींच्या उपस्थितीत ‘आरती- द अननोन लव्हस्टोरी’ चे पोस्टर लॉंच

 

आजवर आपण अनेक प्रेमकथा पाहिल्या असतील, पण प्रत्येक प्रेमकथेत वेगळे पैलू पाहायला मिळतात. याच कारणामुळे काही प्रेमकथा अनाहुतपणे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरतात. ‘आरती- द अननोन लव्हस्टोरी’ या आगामी मराठी चित्रपटातही आजवर कधी समोर न आलेले प्रेमकथेचे पैलू उलगडण्यात येणार आहेत. सारा क्रिएशन आणि मिनिम फाऊंडेशनची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती, लेखन आणि दिग्दर्शन सारिका मेने यांनी केलं आहे. रोशन विचारे आणि अंकिता भोईर यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे.

नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर माननीय मनोहर जोशी यांच्या हस्ते या चित्रपटाच्या कलाकारांच्या उपस्थितीत प्रदर्शित करण्यात आले.

प्रेम म्हणजे दोन मनांच्या मीलनासोबतच त्याग, समर्पण, सेवा आणि प्रामाणिक पणाचं प्रतिक असल्याचं ‘आरती- द अननोन लव्हस्टोरी’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाला प्रियाकर-प्रेयेसीच्या प्रेमासोबतच बहिण- भावाच्या रेशमी नात्याची किनारही लाभली आहे.  वास्तवात घडलेली ही अनोखी प्रेमकहाणी जगासमोर आणण्यासाठी ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान ‘आरती- द अननोन लव्हस्टोरी’ च्या मागे उभ्या राहिल्या आहेत.

वहिदाजींसारख्या एका प्रतिभावान अभिनेत्रीने ‘आरती- द अननोन लव्हस्टोरी’ या चित्रपटाला पाठिंबा देणं यातच या चित्रपटाचं मोठेपण सामावलं आहे. वहिदाजींनी या चित्रपटात असं काय पाहिलं? कोणतेही बडे कलाकार नसतानाही त्यांनी या चित्रपटाला का साथ दिली? ही प्रेमकथी जगासमोर आलीच पाहिजे असं त्यांना का वाटलं? या आणि यांसारख्या ब-याच प्रश्नांची उत्तर आपल्याला या चित्रपटातून मिळणार आहे.

रोशन विचारे आणि अंकिता भोईर यांच्यासोबत सपना कारंडे, उमेश दामले, सुजीत यादव, तेजस बने, मेघाली जुवेकर, प्रांजली वर्मा, कांचन पगारे आदींच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे सहनिर्माते शेफाली साथी आणि बानुमती सुजित आहेत. संवाद प्रभाकर भोसले यांचे आहेत. छायांकन व संकलन ज्योती रंजनदास यांचं आहे. गीते सुजित यादव, तेजस बने यांचे असून संगीत प्रशांत सातोसे आणि सुजित-तेजस यांचं आहे. गीते हरिहरन व आदर्श शिंदे यांनी गायली आहेत आणि कलादिग्दर्शक महेश मेने आहेत. कार्यकारी निर्माते सिध्देश शेट्ये आहेत.