शिक्षणाचे महत्व सांगणार 'क्षितिज'

 

सामाजिक घटनांचा आणि समस्यांचा उहापोह मांडण्याचे प्रभावी माध्यम म्हणजेच सिनेमा. जनसामान्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या काही सामाजिक गोष्टींचा वेध घेण्यासाठी सिनेमा नेहमीच महत्वाची भूमिका बजावत असतो. त्यामुळे आपले मत परखड मांडण्यासाठी आणि काही सामाजिक संदेश देण्यासाठी या माध्यमाचा सर्रास उपयोग केला जातो. 

सामाजिक बांधिलकी जपू इच्छिणाऱ्या अशाच काही संवेदनशील व्यक्तींद्वारे 'क्षितिज' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांसमोर सादर होत आहे. मीडिया फिल्म्स क्राफ्ट कंपनी (यू.एस) आणि नवरोज प्रसला प्रोडक्शन्सचे नवरोज प्रसला निर्मित तसेच करिष्मा म्हाडोलकर यांची सहनिर्मिती असलेल्या  'क्षितिज' या वास्तववादी सिनेमाचे दिग्दर्शन मनौज कदम यांनी केले आहे.

शिक्षणाचे महत्व सांगणारा हा सिनेमा प्रेक्षकांना मनोरंजनासोबतच सामाजिक मूल्यांचा देखील संदेश देणार आहे. अभिनय नव्हे तर आपल्या अभिनयातून सामाजिक शिकवण देणारा कुशाग्र अभिनेता उपेंद्र लिमये यात प्रमुख भूमिकेत असणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे मुंबईत ट्रेलर आणि प्रमोशनल सॉंग लॉंच करण्यात आले. 'क्षितिज' या सिनेमातील सर्व कलाकारांच्या उपस्थितीत सादर झालेल्या या सिनेमाच्या ट्रेलर आणि प्रमोशनल सॉंगला उपस्थितांचा भरघोस प्रतिसाद लाभला.

आजही खेड्यापाड्यात अनेक मुले शिक्षणापासून वंचित आहे. प्रतिकूल परिस्थितींमुळे शिक्षण घेण्यास उत्सुक असूनही शिक्षणापासून वंचित राहिलेली अनेक मुले- मुली आपणास पाहायला मिळतात. अशा या मुलांच्या मानसिकतेचा परिमाण मांडण्याचा प्रयत्न 'क्षितिज' या चित्रपटामधून केला आहे.

या सिनेमाचे प्रमोशनल सॉंग गुरु ठाकूर यांनी लिहिले असून या गाण्याला शैलेंद्र बर्वे यांचे संगीत लाभले आहे, लहान मुलांवर आधारित असलेले हे गाणे सागर म्हाडोलकर यांनी कोरियोग्राफ केले आहे.

शिक्षणाचा सामाजिक संदेश जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही 'क्षितिज' सिनेमाची निर्मिती करण्याचा विचार केला असल्याचे सिनेमाचे निर्माते नवरोज प्रसला यांनी यावेळी सांगितले.

या सिनेमात मनोज जोशी, विद्याधर जोशी, संजय मोने, कांचन जाधव, राजकुमार तांगडे, प्रकाश धोत्रे अशा दिग्गज कलाकारांची फळी पाहायला मिळणार असून, वैष्णवी तांगडे, अर्णव मंद्रुपकर आणि आकांक्षा पिंगळे हे बालकलाकार देखील आहेत.